राज्य मराठी विकास संस्थेचे प्रकल्प व उपक्रम यांची महिती

पुस्तकांचं गाव
महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री मा. ना श्री. विनोदजी तावडे यांच्या संकल्पनेतून ‘पुस्तकांचं गाव’ हा प्रकल्प साकारला आहे. वाचनसंस्कृती जोपासण्यासाठीचा अभिनव प्रकल्प अशी या प्रकल्पाची थोडक्यात ओळख करून देता येईल. महाबळेश्वरजवळील भिलार या निसर्गरम्य गावी हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. भिलार गावात घरे, लॉज आणि शाळा, मंदिरे अशी सार्वजनिक ठिकाणे मिळून ३० जागा निवडण्यात आल्या आहेत. या जागांमध्ये साहित्य प्रकारांनुसार प्रत्येकी सुमारे ५०० ते ७०० पुस्तके अशी सुमारे २५,००० पुस्तके ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक घरात, पर्यटकांना पुस्तके व्यवस्थित पाहता येतील, चाळता येतील आणि प्रसंगी आरामात बसून वाचता येतील अशी व्यवस्था आहे. या गावात राहण्यासाठी उत्तम खोल्या, चहा-न्याहारी-भोजन इत्यादी सेवा सशुल्क उपलब्ध आहे. येथे विविध साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमही नियमित आयोजिले जातात.
प्रकल्पाची वेबसाईट: www.pustakanchgaav.in
मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण, प्रतिमांकन आणि आलेखन
महाराष्ट्रातील मराठीच्या बोलीभाषा कालांतराने व्यपगत होऊ नयेत ह्यासाठी त्या भाषांचे संगणकीय जतन, संवर्धन करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रतिमांकन (डिजिटायझेशन) करण्याचा प्रकल्प. यासाठी डेक्कन कॉलेज, पुणे या अभिमत विद्यापीठाच्या भाषाविज्ञान प्राध्यापक डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी यांच्या नेतृत्वाखाली कालबद्ध कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. यासाठी ३ महिन्यांचे एक प्रशिक्षण होऊन ८ सहायकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे सहाय्यक आणि २ समन्वयक यांचा संघ प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या-त्या ठिकाणची भाषेची रूपे संकलित करत आहेत. या संकलनाचा संपूर्ण भाषावैज्ञानिक अभ्यास करून हा प्रकल्प पूर्ण होईल.
संगणक आणि मराठी
क. मराठी-प्रमाण-लेखन-यंत्रणा
ख. युनिकोड-प्रशिक्षण (संगणकावर मराठीत काम कसे करावे ह्याविषयी मार्गदर्शक चित्रफिती व विकिपीडियात लेखन करण्याविषयी आवाहन करणाऱ्या चित्रफिती निर्मिती व प्रसार)
ग. मुक्त आणि व्यक्त स्रोत (Free and open source) साधनांच्या आधारे मराठीचा प्रसार होण्यासाठी अशा उपयुक्त साधनांचे मराठीकरण
घ. युनिकोड कन्सोर्शियमचे सभासदत्व घेऊन मराठीच्या सर्व रूपांचे अस्तित्व संगणकावर उपलब्ध व्हावेत, यासाठी केलेले प्रयत्न
युनिको़डआधारित मराठी टंक
महाजालावर आणि संगणकावर युनिकोड ही संकेतप्रणाली वापरून मराठीचा वापर वाढत असला तरी संगणकाच्या पडद्यावर मराठी मजकूर दिसण्यासाठी तसेच मजकूर मुद्रित करून घेण्यासाठी आवश्यक असणारे युनिकोड-आधारित मराठी टंक संख्येने बरेच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच त्यांतील बहुसंख्य टंक हे महाराष्ट्र शासनाने प्रसृत केलेल्या दिनांक ६ नोव्हेंबर २००९ च्या वर्णमाला-वर्णलिपीविषयक शासन निर्णयात मान्य केलेल्या निकषांप्रमाणे नसल्यामुळे या शासन निर्णयांतील निकषांशी जुळतील असे ४ ते ५ देखणे युनिकोड आधारित मराठी टंक तयार करून घेऊन ते जनतेला मुक्त ( फ्री ॲण्ड ओपन सोर्स ) परवान्यांतर्गत उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ ह्या दोन टंकांना ‘यशोमुद्रा’ आणि ‘यशोवेणू’ अशी नावे देण्यात आली आहेत.
हे टंक तसेच त्यांची स्रोतसामग्री (सोर्स) ह्या गोष्टी गिटहब ह्या संग्राहिकेतून (रिपॉझिटरीतून) उतरवून घेता येतील
यशोमुद्रा टंक - https://github.com/rmvsmumbai/Yashomudra/releases
यशोमुद्रा टंकाची स्रोतसामग्री - https://github.com/rmvsmumbai/Yashomudra
यशोवेणू टंक - https://github.com/rmvsmumbai/Yashovenu/releases
यशोवेणू टंकाची स्रोतसामग्री - https://github.com/rmvsmumbai/Yashovenu
दुर्मीळ मराठी ग्रंथांचे संगणकीकरण
आजवर प्रकाशित झालेल्या मराठी ग्रंथांपैकी ज्यांच्या स्वामित्व हक्काची मुदत संपली आहे असे मराठी भाषेतील दुर्मीळ ग्रंथ आणि नियतकालिके ह्यांचे संगणकीकरण करून ते महाजालावरून लोकांना उपलब्ध करून देण्यात यावेत अशी सूचना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१०मध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार मराठी भाषा, संस्कृती, साहित्य आणि सामाज जीवन ह्यासंदर्भातील ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या हेतूने मराठीतील दुर्मीळ पुस्तके आणि नियतकालिके ह्यांचे संगणकीकरण (डिजिटायजेशन) करून ते जनतेला उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प संस्था राबवत आहे. आजवर १२९ पुस्तके आणि ५५५ नियतकालिके यांचा संचय अभ्यासकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मराठी विकिपीडिया- संवर्धन
मराठी विकिपीडियातील नोंदींची संख्या आणि गुणवत्ता वाढावी ह्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करणे. २०१६-१७ पासून दरवर्षी किमान १५ कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या. १ ते १५ जानेवारी दरम्यान मराठी भाषा पंधरवड्यात या कार्यशाळा महाराष्ट्राच्या विविध भागांतील विविध महाविद्यालयांत आयोजित केल्या गेल्या.
मराठी ग्रंथसूचिमाला : १९९०-२०००
शं. ग. दाते यांनी १९५० पर्यंतच्या मराठी ग्रंथांची विषयवार सूची दोन भागांत तयार केली होती. ही सूची बरीच वर्षे अनुपलब्ध असल्याने तिचे नवीन परिशिष्टांसह पुनर्मुद्रण संस्थेने केले. इ. स. १९५० नंतर मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथांची एकत्रित अशी विषयवार ग्रंथसूची उपलब्ध नसल्याने राज्य मराठी विकास संस्थेने 'मराठी ग्रंथसूचीमाला' हा प्रकल्प हाती घेतला असून त्याअंतर्गत इ. स. १९५१ ते २००० या कालखंडातील मराठी ग्रंथांची विषयवार सूची करण्यात येत आहे. आतापर्यत या मालेतील चार भाग --- भाग ३ (१९५१-१९६२), भाग ४(१९६३-१९७०), भाग ५ (१९७१-१९७८) आणि भाग ६ (१९७९-१९८५) --- प्रकाशित करण्यात आले आहेत. इ. स. २००० पर्यंतच्या कालखंडातील ग्रंथांची नोंद करणाऱ्या पुढील भागांचे काम चालू आहे. मराठी ग्रंथांची विषयवार सूची करणे. आजवर संस्थेने १९५१ ते १९८६ ह्या काळातील सूची तयार करवून घेतली आहे. (संपा. श्री. शरद साठे) १९९१-२००० ह्या कालखंडातील सूची (संपा. ५ संपादकांचे संपादकमंडळ) मुद्रित न करता महाजालावर विदागाराच्या (डेटाबेसच्या) स्वरूपात वितरित करण्यात येणार आहे.
मराठी- भाषा- अभ्यासक- पुरस्कार आणि मराठी- भाषा- संवर्धक- पुरस्कार
अशोक केळकर भाषा-अभ्यासक-पुरस्कार आणि मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक-पुरस्कार ह्या पुरस्कारांसाठी शिफारशी मागवणे, त्यांतून निवड करण्याची कार्यवाही करून पुरस्कार प्रदान करणे. या अनुषंगाने भाषेचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी २७ फेब्रुवारी, या मराठी भाषा गौरव दिनी सन्मान केला जातो.
अमराठी भाषिकांसाठी अध्ययन /अध्यापन साधने विकसित करणे
अमराठी भाषिकांना उत्तम दर्जाचे मराठी शिकविण्यासाठी साधने तयार करणे आणि अमराठी भाषिकांना प्रशिक्षणात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या पुढाकाराने मायमराठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार ६पातळ्यांचा अभ्यासक्रम तयार होतो आहे. पातळी १ चे चलभाष अॅपही विकसित करण्यात येत असून हा संपूर्ण अभ्यासक्रम अशा आधुनिक साधनांद्वारे उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. जर्मन विभाग प्रमुख डॉ. विभा सुराणा ह्या सदर प्रकल्पाच्या प्रमुख आहेत.
ऑलिम्पिक माहितीकोश
ऑलिम्पिक या स्पर्धेविषयी, त्यातील खेळांविषयीची समग्र माहिती उपलब्ध करून देणारा अद्ययावत कोश मराठीत नाही. तसा माहितीकोश ई-बुक स्वरूपात तयार करण्याचा प्रकल्प आकारास येत आहे. पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी येथे ह्या कोशाचे काम सुरु असून हेमंत जोगदेव हे त्याचे प्रमुख संपादक आहेत.
तंजावर येथील मोडी कागदपत्रांचे जतन व संवर्धन प्रकल्प
तमिळ विद्यापीठ, तंजावर यांच्याबरोबर करार करून तंजावर येथील मोडी हस्तलिखितांचे मराठीकरण करण्याचा प्रकल्प संस्थेने माहे मार्च २०१३मध्ये सुरू केलेला आहे. या प्रकल्पांतर्गत अतिमहत्त्वाच्या मोडी हस्तलिखितांचे जतन व संवर्धन करण्यासाठी, पूर्वतयारी म्हणून त्यांची साफसफाई, दुरुस्ती करून त्यांची विषयाप्रमाणे सूची (कॅटलॉग) तयार करणे व ती कागदपत्रे संगणकावर (डिजिटायजेशन) आणणे व त्या कागदपत्रांचे मराठीत सूचीकरण करून ते प्रकाशित करणे असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. सध्या यातील पाच लाख हस्तलिखितांपैकी ३ लाख ५ हजार ४८० इतक्या कागदपत्रांची साफसफाई, कादपत्रांच्या घड्या काढणे, फाटलेली व जीर्ण झालेली हस्तलिखितांची दुरुस्ती करण्याची कामे पूर्ण झालेले असून, ती कागदपत्रे संगणकीकरण्यासाठी (डिजिटायजेशन) तयार केलेली आहेत. या कागदपत्रांचे संगणकीकरण करण्याची
दासोपंतकृत गीतार्णव शब्दार्थ-संदर्भकोश
नाथपंचकातील एक महत्त्वाचे कवी दासोपंत, यांनी लिहिलेली गीताटीका म्हणजेच गीतार्णव हा ग्रंथ होय. या साहित्यकृतीतील मराठी भाषेचे आणि मराठी साहित्याचे मध्ययुगीन कालखंडातील भाषिक वैभव मराठी भाषिकांना कळावे व अभ्यासकांना त्याचा उपयोग व्हावा. हा ग्रंथ साहित्य आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून अभ्यासकांना समजून घेताना अडचण येऊ नये म्हणून ‘गीतार्णव शब्दार्थ संदर्भकोश’ हा प्रकल्प राज्य मराठी विकास संस्थेने हाती घेतला आहे. या ग्रंथांत एकूण १८ अध्याय असून त्यात १ लाख २५ हजार ओव्या आहेत. यातील १,२,१२,१६ आणि १८ हे अध्याय मुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत, तर उर्वरित अध्याय हस्तलिखित स्वरूपात आहेत.
दलित-ग्रामीण साहित्य शब्दकोश व सूची
दलित-ग्रामीण साहित्यातील नवीन आणि अपरिचित शब्द, संज्ञा, संकल्पना, म्हणी, वाक्यप्रयोग प्रमाण मराठी भाषेत येणे आवश्यक असल्याने, असे शब्द विविध साहित्यकृतींमधून निवडून, त्यांचे अर्थ, तपशीलांसह या कोशात दिलेले आहेत. सुप्रसिद्ध समीक्षक स्व. गंगाधर पानतावणे यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली शब्दकोशाचे ३ खंड आणि विधी-परंपरा-कोशाचा १ खंड प्रकाशित झाला आहे.
मराठी संशोधन संस्थांना / मंडळांना अर्थसाहाय्य करणे
महाराष्ट्रात बऱ्याच संस्था खास मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संशोधनासाठी स्थापन झाल्या आहेत. मात्र निधीअभावी या संस्थांचे काम थंडावते आहे. मराठीसाठी काम करण्याचा उत्साह आहे, नवनव्या कल्पना आहेत मात्र निधीअभावी ते पूर्ण करता येत नाही, अशी कैफियत मराठीच्या कार्यकर्त्यांनी श्री. विनोदजी तावडे, मा. मंत्री, मराठी भाषा यांच्या कानी घातली होती. त्यावर उपाययोजना करताना, ही योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यानुसार नोंदणीकृत मराठी संस्थांना आपल्या विविध संशोधन प्रकल्पांसाठी जास्तीतजास्त रु.५ लाख इतके अर्थसाहाय्य करण्यात येते.
बालभारती समांतर पाठ्यपुस्तकांची छपाई व वितरण
सुहृद मंडळ, पुणे यांनी कर्णबधिर विद्यार्थ्यांची भाषिक गरज लक्षात घेऊन भाषा शिकताना त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी बालभारतीच्या पुस्तकांना समांतर अशी मराठी पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली. हे सर्व पुस्तके महाराष्ट्रातील कर्णबधिर शाळांना मोफत वितरीत करण्यात आली आहेत.
मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृतींची श्राव्य पुस्तके (ऑडिओ सीडी)
या प्रकल्पांतर्गत मराठीतील प्रसिद्ध निवडक संतसाहित्य तसेच ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या साहित्यिकांचे साहित्य, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्य व महाराष्ट्र शासन पारितोषिक विजेते निवडक साहित्यकृतींची श्राव्य पुस्तके तयार करण्यात येणार असून, आतापर्यंत कृष्णाकाठ (स्व. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र) व श्री दासबोध (श्री समर्थ रामदास) या ग्रंथांची श्राव्य पुस्तके तयार करण्यात आली आहेत. ही पुस्तके संस्थेच्या संकेतस्थळावरून जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या ऑडिओ सीडीही संस्थेच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठीतील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर यांचे अनुक्रमे रसयात्रा व प्रवासी पक्षी तसेच संहिता आणि आदिमाया ह्या कवितासंग्रहांची श्राव्य पुस्तके संस्थेच्या संकेतस्थळावर जनतेसाठी विनामूल्य उपलब्ध करण्यात आली आहेत.